Weather Update: राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीने कहर केला आहे. शनिवारी राज्यात तापमानात मोठी घट झाली, तर पुढील काही दिवसांत तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारी धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, जे 4.4 अंश सेल्सिअस होते. जळगाव जिल्ह्यातही तापमान 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या जोरामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील दोन दिवसांत पुणे आणि मुंबईसह संपूर्ण राज्यात कडक थंडी आणि धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात शनिवारी तापमानात लक्षणीय घट झाली, किमान तापमान 10.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी सकाळीही मोठ्या प्रमाणात गारठा जाणवला आणि शहरभर धुके पसरले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्याचे दृश्य पाहायला मिळाले. पुढील पाच दिवस पुण्यात हवामान कोरडे राहील आणि तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान 9 ते 10 अंशांवर आले आहे. पुढील काही दिवसांत थंडीची लाट आणखी तीव्र होणार असून ती 18 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी वाढत आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी तीव्र होईल. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, मात्र थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
IMD च्या मते, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे तापमान घटत आहे. यासोबतच दक्षिण अंदमान समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी वाढण्यास हातभार लागला आहे.